" पुन्हा एकदा वाचविले एक हृदय "
" जागतिक हृदय दिन "
❤️USE HEART,
KNOW HEART ❤️
29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. हृदय विकार व मेंदूचा अटॅक (cardiovascular disease - CVD) हे जगातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. जगातील सर्व प्रकारच्या मृत्यू पैकी 31 % मृत्यू हे हृदय रोगामुळे होतात. जगभरामध्ये दरवर्षी 1.7 करोड लोक , हृदयरोग व मेंदू विकार (CVD) यामुळे मृत्युमुखी पडतात.
हृदयरोग व तत्सम आजाराविषयी माहिती व जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी असा समज होता की, हृदयरोग हा फक्त प्रगत (developed countries ) देशांमध्येच जास्त आढळतो पण, अभ्यासा अंती असे लक्षात आले आहे की, जगातील जवळपास ८० % हृदयरोगाचे मृत्यू हे प्रगतशील (Developing Countries) देशांमध्ये होतात. यामुळे कमी वयामध्ये हृदयरोग होणे , त्यावरील उपचाराचा खर्च व अवेळी मृत्यू होणे हे वैयक्तिक कुटुंबाच्या दृष्टीने , तसेच देशासाठी अतिशय हानिकारक आहे.
❤️हृदयरोगाची प्रमुख कारणे :-
A) . अतिशय महत्त्वाची व बदलता येण्याजोगी कारणे (Modifiable Risk Factors.)
1) उच्च रक्तदाब (High Blood Pressure).
2) प्रमाणापेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल (High cholesterol specially serum LDL)
3). मधुमेह (Daibetes )
4). वाढलेलं वजन (Obesity).
5). धूम्रपान- तंबाखू व तत्सम पदार्थांचे सेवन.
6). व्यायामाचा अभाव अथवा बैठी जीवनशैली. ( Physical Inactivity )
7). ताण - तणाव .
8). दारूचे अती सेवन.
B ). बदलता न येण्याजोगी हृदय
रोगाची कारणे. :-.
१. वाढते वय ,
२. अनुवंशिकता.
सध्याची धावपळीची जीवनशैली , ताण - तणाव, वाढलेले वजन, चुकीची आहार पद्धती, धूम्रपान, यामुळे कमी वयामध्ये अतिउच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, असे आजार उद्भवतात. परिणामी कमी वयामध्ये आपणास हार्ट अटॅक व पॅरॅलिसिस चा अटॅक येण्याची संभावना वाढते.
❤️हार्ट अटॅक म्हणजे नेमके
काय ? ❤️ :-
उच्च रक्तदाब, अनियमित मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, तंबाखूचे सेवन, ताण - तणाव, वाढलेले वजन, या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू चरबीचा थर जमतो. ही प्रक्रिया शरीरातील सर्वच रक्तवाहिन्यांमध्ये होत असते.परंतु, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ,
, मेंदूतील रक्तवाहिन्या, किडनीच्या रक्तवाहिन्या, यामध्ये जास्त प्रमाणात चरबीचा थर जमतो. काही वेळेला अचानक एखाद्या रक्तवाहिनी मधील चरबीची गाठ तुटते आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी मध्ये अडकून बसते , यालाच हृदयाचा अटॅक अथवा हार्ट अटॅक म्हणतात. तशीच चरबीची गुठळी मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडकली तर त्यास मेंदूचा अटॅक अथवा प्यारालिसिस असे म्हणतात.
* ❤️हार्ट अटॅक ची प्रमुख
लक्षणे ❤️ :-
- छातीमध्ये दुखणे, घाम येणे, छातीवर ओझे दिल्यासारखे वाटणे, छाती आवळल्यासारखे वाटणे, छाती भरून येणे, छातीतील दुखणे जबड्याकडे जाणे, अथवा दोन्ही हातांमध्ये जाणे, श्वास घेण्यास अचानक त्रास होणे , असे अनेक प्रकारची लक्षणे असू शकतात.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना बऱ्याच वेळा अत्यंत कमी प्रमाणामध्ये छातीमध्ये दुखते परंतु त्यांना अतिशय गंभीर स्वरूपाचा हार्ट अटॅक असू शकतो. अशावेळी तात्काळ वैद्यकीय सल्ला व उपचार घेणे महत्त्वाचे असते. अशा हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांना तात्काळ हृदय रोगावर उपचार उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार घेणे आवश्यक असते.
* ❤️ हृदयरोग टाळण्यासाठी चे
उपाय ❤️ :-
- वाढत्या वयानुसार कसलाही त्रास नसला तरीही वय 35 ते 40 वर्ष पुढील व्यक्तींनी आपली संपूर्ण तपासणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींना रक्तदाब आहे त्यांनी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, त्यावरील औषध उपचार नियमित घेणे, नियमित तपासणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी त्यास नियंत्रित ठेवणे, तसेच नियमित Blood sugar , cholesterol तपासून त्यास नियंत्रणात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
मधुमेहामुळे शरीरातील प्रत्येक अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत वेळोवेळी त्रास नसला तरीही सर्व तपासण्या करणे व आवश्यक ते उपाय करणे गरजेचे असते. मधुमेहा मुळे , डोळे , किडनी , हृदय , मेंदू , शरीरातील सर्व नसा व रक्तवाहिन्या यांवर दुष्परिणाम होतात. परंतु वेळोवेळी तपासण्या करून मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास असे दुष्परिणाम आपण कमी करू शकतोत. तसेच शरीरातील होणारे दुष्परिणाम तपासण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या आवश्यक त्या तपासण्या , त्रास नसल्या तरीही करणे आवश्यक असते.