#कथा
#वो कौन थी
©स्वप्ना...
ती धडधड जिना उतरत खाली आली,.. भराभर सूचना देत तिने हॅन्डग्लोज चढवले,.. बाजूला म्हातारी मदतनीस तयारच होती,..हल्लीच्या नर्सपेक्षाही तत्पर आजी जी बऱ्याच डिलिव्हरी करून आताही तयारच होती,..तिला नेहमीच्या सूचना दिल्या आणि विचारलं,...आजी तयार आहेस ना?हिच्या पिल्लुला जास्तच गडबड दिसते,.. मघाशी वर जेवायला जाताना चेक करून निघाले होते तेंव्हा वाटलं वेळ आहे,..आज काही जेवणाचा योग दिसत नाही सकाळचे दोन सिजर मधले पेशन्ट आणि आता हिची वेळ पण हे सगळंच आपलं आयुष्य आहे असं म्हणत आणि हे सगळं मनापासून स्वीकारलेल्या डॉ.ज्योतीने नेहमीप्रमाणे भिंतीवरच्या आदिशक्तीच्या फोटोला नमस्कार केला आणि ती पेशन्टकडे वळली,.. एवढया वेळच तिच्या लक्षात आलं नाही की स्टाफ शिवाय आणखी कोणी उभं आहे बाजूला,..पण एकदम तिच्या केसात हात फिरवणारी ती दिसताच ज्योती म्हणाली,"तुम्ही बाहेर व्हा प्लिज आम्हाला आमचं काम करू द्या."
डॉक्टरच्या म्हणण्यावर ती बाई काहीच बोलली नाही फक्त डोळ्यात पाणी आणून तिने हात जोडले,...त्या डोळ्यात भाव होते काकुळतीचे,..हिला लवकर मोकळं करा अशी विनवणी करणारे,..ज्योतीला ह्या सगळ्या गोष्टींची सवय होती,..तिने एक विश्वासाचं हसू फक्त दिलं,..लेबररूममध्ये काही वेळ अगदी धूम होती,..वेदना,आक्रोश आणि ह्या सगळ्यातून सोडवण्यासाठी धडपडणारी ती डॉक्टर आणि तिचे सहकारी,..वेदनेचा उच्च चित्कार झाला आणि तो रडण्याचा आवाज आला,..एवढ्या वेळ वेदनेने कळवळणारी ती स्वतःला सावरत ओरडली डॉकटर बाळ कसं आहे माझं,..?ज्योती हसून म्हणाली,"तुझ्यासारखंच गोड आणि सुंदर,..तू आता शांत पड मला माझं काम करू दे,..
नेहमीच रक्तच ते थारोळं आणि त्यात प्रचंड वेदनेतून आयुष्याचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार स्वीकारणारी ती आई हे चित्र बघून ज्योती मनोमन आंनदी व्हायची स्वतःला कधी मुल झालं नाही पण अनेक आयांच हे स्वप्न पूर्ण करत त्यांना कमीत कमी वेदना होतील यावर लक्ष देत ज्योती शिताफीने सगळं पार पडायची,..आताही ती तिला जमेल तेवढा कमी त्रास होईल ह्या पद्धतीने टाके घालत होती,..पेशन्ट मघाच्या श्रमाने काहीशी बेशुद्ध असली तरी मध्येच सुईच्या टोचण्याने ओरडत होती आईग,..आई.."झालं झालं म्हणत ज्योतीने सगळं आटपलं,..
तेवढ्यात दार उगाच उघडून बंद झाल्यासारखं ज्योतीला वाटलं,..कोण गेलं म्हणून ज्योतीने पटकन दार उघडून बाहेर डोकावलं पण मघाशी केविलवाणी हात जोडलेली बाई पुन्हा केविलवाणी होऊन हात जोडून धन्यवाद म्हणत होती,..तेवढ्यात ती नोकर आजी ते बाळ ज्योतीला दाखवत म्हणाली,"मॅडम हे लेकरू घ्यायला इथं ह्या पेशन्ट कडचे कोणीच नाही,..ज्योती हसत म्हणाली," त्या आजी आहेत ना बाळाच्या मघाशी आत थांबल्या होत्या त्यांना द्या ना बाळ,.."
आजी म्हणाली,"मॅडम कोणीच नाही मी बाहेरच्या गेटपर्यंत पाहिलं,..थांबा ह्या पेशन्टलाच विचारू,..असं म्हणत आजी आत शिरली पाठोपाठ ज्योती गोंधळलेल्या मनाने आत आली,.. आजी पेशंटला म्हणाली,"ए आग बाळ कोणाकडे देऊ,..पेशन्ट रडतच म्हणाली,"इथंच ठेवा माझ्या कुशीत माझ्या बाळाला दुर्दैवाने कोणीं नाही,..आणि मॅडम मघाशी तुमच्या हॉस्पिटलमधली कोण बाई माझ्या डोक्यावरून हात फिरवून धीर देत होती ना तिला मला काही बक्षीस पैसे द्यायचे आहेत हो,..अगदी माझ्या आईसारखी माझ्या डोक्यातून हात फिरवत मला धीराचा स्पर्श देत होती ती बाई,..
तिचं हे वाक्य ऐकताच आजीने आश्चर्याने ज्योतीकडे पाहिलं आणि म्हणाली,..."मॅडम ह्या बाईला काय इंजक्शन जास्त झालं की काय इथं तुमच्या माझ्याशिवाय कोण बाई होती,..आपले दोन गडी माणसं आणि म्या बाकी कोण हिच्या डोक्यातून हात फिरवित होतं,.. येडी झाली होती तू कळा देऊन,..झोप आता अवरू दे आम्हाला,..म्हणत तिला दुसऱ्या खोलीत नेण्यासाठी स्ट्रेचर आणायला आजी निघून गेली,.."
ज्योती अजूनही सुन्न होती,..पेशन्ट परत म्हणाली,"डॉकटर खरंच होतं हो कुणीतरी माझ्या डोक्याशी मला धीर देणारं,.. माझी आई दोन महिन्यापूर्वीच गेली माझं डोहाळजेवण तिने खुप आनंदाने केलं,..मला सगळं समजावत होती, मी असेलच तुला धीर द्यायला,तुझं बाळंतपण आपण नॉर्मलच करायचा आग्रह करू,..बाळाची काळजी नको करू मी त्याला तळहातावर खेळवेल,..तू फक्त घाबरू नकोस हं ताईसारखी आणि जीव सोडू नकोस,..आपल्या बाळासाठी आपल्याला जगायचं असत हे नेहमी लक्षात ठेव,..ताईंची लेक बघ कशी पोरकी झाली,..आपण असलो तरी आईची उणीव नाही ग भरून निघत,..आई ती आईच असते ग,..असं मला सांगणारी आई अचानक अपघातात गेली डॉकटर पण मघाशी अगदी तिच्यासारखं कोणीतरी होतं तुमच्या दवाखान्यातलं,..डॉकटर प्लिज बघा ना ती बाई कोण होती,..?"