'हम'ने पुन्हा अमिताभची जादू अधोरेखित केलीही. पण 'गंगा जमना सरस्वती', 'तूफान', 'जादूगर', 'इन्सानियत' या सिनेमांनी अमिताभच्या चाहत्यांना देखील हसावे की रडावे, ते कळत नव्हते!
अमिताभ संपला होता. राजेश खन्ना संपला, तसा अमिताभही संपणार होताच.
तो काळ आणखी वेगळा होता. सगळीकडे प्रस्थापितांना आव्हान दिले जात होते. १९८४ ला पाशवी बहुमत मिळवणा-या कॉंग्रेसला आता आघाडी करून सत्ता टिकवावी लागत होती. छोटे छोटे प्रादेशिक पक्ष रिंगणात उतरत होते. जागतिकीकरणाने दरवाजे उघडले होते. सोव्हिएत रशिया कोसळत होती. इंटरनेटने जग जोडणे आरंभले होते. घरोघरी छोटा पडदा आलेला होता. रेशनच्या बाहेर उभ्या असणा-या अमिताभभक्तांची मुलं मॉलमध्ये जाऊ लागली होती. माफियांच्या रंगमहालात ट्रिंग ट्रिंग वाजणा-या अवजड फोनची जागा मोबाइल घेऊ लागला होता. सरकारी कचे-यांपेक्षा चकचकीत कॉर्पोरेट कंपन्या खुणावत होत्या. 'जीना हो तो आपुन के जैसे ही जीना', असं म्हणत बॅंक बॅलन्स से रंगीन जगण्याची स्वप्नं ऊर्मिला मातोंडकर दाखवू लागली होती. जुनं संपू लागलं होतं, हे नक्की. पण, नवं नक्की काय येतंय, हे कळत नव्हतं. या गोंधळात अमिताभनं काही वर्षं काढली. तो या काळाचा स्टार नव्हता. त्याचा काळ संपलेला होता. त्याच्या मित्राच्या - राजीव गांधींच्या आग्रहानं तो राजकारणात आला. त्याच्यालेखी हीच 'सेकंड इनिंग' असावी. लोकसभा निवडणूक जिंकून, हेमवतीनंदन बहुगुणांना हरवून अमिताभ खासदारही झाला. पण, ते काही त्याला झेपलं नाही. पुन्हा तो पडद्याकडंच वळला. एकविसावं शतक आलं होतं. अमिताभ साठीचा होत होता. त्याच्यासाठी हा निवृत्तीचा काळ होता.
आणि, मग ते घडलं.
शर्टाला गाठ मारलेला अमिताभ एकदम ब्लेझर घालून अवतरला. व्यवस्थित केस. स्टायलिश चष्मा. देखणी-सुसंस्कृत आणि तरीही तरूणाईचा डौल असणारी खेळकर भाषा. सुटाबुटात अमिताभ घरात आला. मोठा पडदाही ज्याला छोटा पडत असे, असा 'लार्जर दॅन लाइफ' अमिताभ छोट्या पडद्यावर आला. 'कौन बनेगा करोडपती' सुरू झालं आणि अमिताभनं सगळ्यांना खिळवून ठेवलं. कपड्यांची तमा न बाळगता, वेड्यासारखा धावणारा, एका फाइटमध्ये खलनायकांना लोळवू शकणारा, हा ॲक्शन हीरो एका जागी खुर्चीत बसून खेळवू लागला आणि खिळवू लागला. लोक म्हणाले, ही कमाल अमिताभची नाही. 'करोड'ची आहे. पण, तसाच खेळ खेळण्याचा प्रयत्न प्लेबॉय सलमानपासून ते 'ॲक्टर' अनुपम खेरपर्यंत इतरांनीही करून बघितला. मग कळलं, ही गंमत कोणाची आहे!
मग अमिताभ गप्प बसलाच नाही. 'अक्स', 'कभी खुशी, कभी गम', 'बागबान', 'ब्लॅक', 'चिनीकम', 'बंटी और बबली', 'पिंक', 'परिणिता', 'पा', 'शमिताभ', 'गुलाबो सिताबो', 'झुंड' अशी किती नावं घ्यावीत, अगदी ताज्या 'गुडबाय'पर्यंत. पण, अमिताभ काही 'गुडबाय' म्हणायला तयार नाही. 'आनंद', 'जंजीर', 'नमकहराम', 'दीवार', शोले', कभी कभी', 'अभिमान' 'अमर अकबर ॲंथनी', 'डॉन', 'मुकद्दर का सिकंदर', 'नसीब', 'सिलसिला', 'शक्ती' 'अंधा कानून', 'कुली', 'मर्द', 'शराबी' असे एकेक भन्नाट सिनेमे तेव्हा देणारा अमिताभ आजही तेवढ्याच ताकदीने नवनवे सिनेमे घेऊन येतो आहे. आजोबा आणि नातू दोघेही अमिताभचे फॅन आहेत. बाकी, 'जनरेशन गॅप' कितीही मोठी असली तरी अमिताभ आवडण्याविषयी त्यांच्यात एकमत आहे.
काय जादू आहे ही?
सत्तरच्या दशकात आम्ही जन्मलो. तेव्हा आमच्या वडिलांच्या पिढीचा हीरो अमिताभ होता. आमच्या कॉलेज कॅंटिनमध्येही अमिताभ होता. आणि, आताच्या 'जनरेशन झेड'च्या स्टारबक्समध्येही अमिताभ येतो. ओटीटीही अमिताभ व्यापून टाकतो.
आज ११ ऑक्टोबरला अमिताभ ८२ वर्षांचा होतोय. म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला 'अहो-जाहो' करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला 'मर्द' गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या 'नमक'चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा 'सिलसिला' सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!
आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकुम अभ्यासपूर्वक काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण, अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच 'चिनीकम' करावा वाटतो वा 'पा'मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. 'मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली', असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला 'मोक्ष' मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारला अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही. अमिताभ सुपरस्टार झाला, तेव्हा ज्या मुली जन्मल्याही नव्हत्या, त्या आता अमिताभच्या नायिका म्हणून पडद्यावर येताहेत.
काय आहे हे?