दुसरं नातं म्हणजे आजी आजोबा आणि नातवंडे. अनुभवांची भरगच्च शिदोरी ज्यांच्या जवळ असते ते म्हणजे आजी आजोबा. शाळेत जाताना हळूच थरथरत्या हाताने नातवाच्या किंवा नातीच्या हातावर १० रु. २० रु. ठेवून खाऊ खा हं असं प्रेमाने सांगणारे. त्यांचा सहवास हा कितीही लाभला तरी कमीच असतो हो. मला आठवतंय, मी शाळेतून घरी आल्यावर गरम गरम वरणभात देणारी व शाळेच्या पहिल्या दिवशी बटाट्याची भजी तळणारी माझी आजी. या सुखाला तोडच नाही. या प्रेमाची, सहवासाची मोजणी होऊच शकत नाही. फक्त ते सुख अनुभवणं म्हणजे पर्वणीच असते. व.पु. म्हणतात तसं, " नभांगणातल्या चांदण्या मोजत बसायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे ह्या आनंदात विहार करायचा असतो.."
पार्टनर मधील एक ओळ आहे, " लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.." हे नातं म्हणजे मैत्रीचं. जिथे सुख दुःख अगदी हक्काने व्यक्त करता येतं. मैत्रीची अनेक उदाहरणे देता येतील. जसं की, ही दोस्ती तुटायची नाय म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री. मैत्रीमध्ये जेव्हा सहवास वाढतो तेव्हा ती अधिक घट्ट होते. तिथे व्यवहार नसतो. असते ते फक्त प्रेम.. तुम्हाला माहित आहे, प्राण्यांना बोलता येत नाही पण तरीही त्यांना स्पर्शाची भाषा चांगली समजते. घरातली एखादी व्यक्ती लवकर आली नसेल तर तो मुका जीव दाराशी वाट पाहत बसलेला असतो. कारण, त्यांना देखील त्या सहवासाची, प्रेमाची सवय झालेली असते. हा सहवास खरंच लाखमोलाचा असतो.
अशी नाती मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. कारण ती जीव ओवाळून टाकावी अशी असतात. सहवासाचं कोंदण असते ना त्यामध्ये.. शेवटी काय तर, सहवासाने नाती बहरतात तर प्रेमाचं शिंपण पडलं की ते टवटवीत होते. जसं, आपण नवीन रोप आणतो, त्यात जसं खत लागतं, सुर्यप्रकाश लागतो तसंच पाणी देखील लागते. कारण, वेळच्या वेळी पाणी घातले नाही तर झाड सुकते,कोमेजते. तसंच, नात्यात संवाद, सहवास आणि ओढ नसेल तर ते नाते देखील सुकून जाते. म्हणून ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवली पाहिजे पाहिजे..
.. मानसी देशपांडे