*भोगी*
* मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी .*
भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो. 'न खाई भोगी तो सदा रोगी' हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात, याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात! या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.
* भोगी साजरी का करावी?*
या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरूवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगिकारलं जातं. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे.
या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. म्हणजे तुम्ही वसई-पालघरकडे वाडवळांकडे जेवायला गेलात, तर त्यांनी पद्धत एकदम भिन्न असलेली दिसते. किंबहुना त्यांची पद्धत उंधियुच्या एकदम जवळ जाणारी आहे आणि त्यांनी या भाजीला दिलेलं नावही भन्नाट आहे-उकडहंडी. भोगीची भाजी करायची अजून एक पद्धत आहे. ही पद्धत कोकणातल्या मासेखाऊंची आहे. भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी, कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते. थेट मटणासाठी वापरला जाणारा मसालाच या भाजीसाठी वापरत असल्यामुळे घरात मटण शिजत असल्याचाचा भास होतो. पण प्रत्यक्षात चिकन-मटण नसलं तरी काही फरक पडत नाही. कोकणी घरात शिजलेली ही भोगीची भाजीच इतकी फर्मास असते की, त्यापुढे चिकन-मटणही फिके पडेल.
* भोगीची चारोळी *
भोगी सण आनंद उपभोगाचे तत्व,
सवाष्ण महिलेचे पुजिले जावे सत्व;
भोगी सण सांगे नारीशक्तीचे ममत्व,
सवाष्णला दिलेल्या दानाचे महत्व!
* भोगीची भाजी.*
साहित्य:- तीन-चार प्रकारच्या पापडी शेंगा व त्यांचे दाणे, छोटी वांगी, बटाटे, गाजर, मेथी, बेसन, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, काळा गोडा मसाला, हळद, मोहरी, हिंग, गूळ, अर्धी वाटी तीळ, नारळाच्या अध्र्या करवंटीचा चव, दहा-बारा कढीपत्ता पाने, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, तीन-चार हिरव्या मिरच्या आणि तेल (प्रत्येक भाजी कमी-जास्त प्रमाणात घ्यावी. उदा. दोन बटाटे, दोन गाजर या नुसार)
कृती:-
*मुटके* मेथीची भाजी धुऊन घेऊन बारीक चिरावी. त्यात तिखट, मीठ, तीळ, धणे-जिर