एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की, मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू ? त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रगट झाले. त्याखेरीज उपवेद, न्यायशास्त्र, होता, उद्गाता, अध्वर्यु, आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म, यज्ञांचा विस्तार, धर्माचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती, हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासूनच उत्पन्न झाले. (३४-३५)
विदुराने विचारले - हे तपोधन, विश्वरचनेचे स्वामी श्रीब्रह्मदेवांनी आपल्या मुखांतून या वेद इत्यादींची रचना केली. तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली, हे आपण सांगावे. (३६)
मैत्रेय म्हणाले - विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम, आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली. तसेच याच क्रमाने शस्त्र(होत्याचे कर्म), इज्या(अध्वर्यूचे कर्म), स्तुतिस्तोम(उद्गात्याचे कर्म) आणि प्रायश्चित(ब्रह्म्याचे कर्म) या चारांची रचना केली. याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, आणि स्थापत्यवेद या चार उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखांपासून उत्पन्न केले. नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या चारी मुखांपासून इतिहास-पुराणरूपी पाचवा वेद तयार केला. याच क्रमाने त्यांच्या पूर्वादी मुखांपासून षोडशी आणि उक्थ, चयन, आणि अग्निष्टोम, आप्तोर्याम, आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे दोन-दोन यज्ञही उत्पन्न झाले. विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह चार आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. सावित्र, प्राजापत्य, ब्राह्म, आणि बृहत् या चार वृत्ती ब्रह्मचार्याच्या आहेत. तसेच वार्ता, संचय, शालीन, आणि शिलोञ्छ या चार वृत्ती गृहस्थाश्रमाच्या आहेत. याच प्रकारे वृत्तिभेदाने वैखानस, वालखिल्य, औदुंबर, आणि फेनप हे चार भेद वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटीचक, बहूदक, हंस, आणि निष्क्रिय(परमहंस) हे चार भेद संन्याशांचे आहेत. याच क्रमाने आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता, आणि दंडनीती या चार विद्या आणि चार व्याहृतीसुद्धा ब्रह्मदेवाच्या चार मुखांपासूनच उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ॐकार प्रगट झाला. त्यांच्या रोमांपासून उष्णिक्, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप्, स्नायूंपासून अनुष्टुप्, हाडांपासून जगती, मज्जांपासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले. याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण(क वर्गादी पाच वर्ग) आणि देह स्वरवर्ण(अकारादी) म्हणविला गेला. त्यांच्या इंद्रियांना ऊष्मवर्ण (श,ष,स,ह) आणि शक्तीला अंतःस्थ (य,र,ल,व) म्हणतात. तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, धैवत, आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले. ब्रह्मदेव शब्दब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणीरूपाने व्यक्त आणि ॐकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे, तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहे. (३७-४८)