डोळ्याचा भाव
रात्री दहा-अकराची वेळ. शहरात निजानीज झाली होती. दिवसा गर्दीगोंगाटाने गजबजून गेलेले शहर आता शांत होते. अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता-
“देवा, तू मला काही दिलं नाहीस. मला राहायला घर नाही. अंगावर घालायला कपडे नाहीत. भरपूर खायला-प्यायला नाही. देवा, तू माझ्यावर फार अन्याय केला आहेस रे."
त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहात होता. लांडीलबाडी न करता सचोटीने व्यापारधंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते. या वेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत आपल्या दिवाणखान्यात बसलेला होता. गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्याचे ओरडणे ऐकू आले-
" देवा, तू मला काही काही रे दिलं नाहीस. आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तरी मी तकार केली नसती; पण देवा, तू मला भिकाऱ्यापेक्षा भिकारी केलं आहेस."
गाण्यात रमलेले त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले. त्याने हात वर करून म्हटले,
" गवई महाराज, माफ करा. थोडा वेळ गाणं थांबवा !”
आणि त्याने आपल्या नोकराला रस्त्यावर पाठवले. नोकर भिकाऱ्याला थांबवून म्हणाला,
आमचे धनी तुला बोलावत आहेत. जरा वर चल.
भिकारी थोडा घाबरला. असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते. त्याला वाटले, हे मोठे घर कोणा मोठ्या अधिकाऱ्याचे असेल. आपल्या ओरडण्यामुळे त्यांना राग आला असेल.
काय होईल ? फार तर रट्टे मिळतील. हळू आवाजात ओरड अशी ताकीद मिळेल.
मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला. श्रीमंताने त्याला विचारले, “बाबा रे, तू रस्त्यानं काय ओरडत चालला होतास ?
"
महाराज, मी तुमचं नाव नाही घेतलं. मी आपला देवाच्या नावानं ओरडत होतो.
“ का बरं? देवानं असं तुझं काय वाईट केलंय ?”
महाराज, देवानं मला काही दिलं नाही. तुमच्यासारखा मोठा वाडा नाहीच; पण साधं घरसुद्धा नाही. तुमच्यासारखे रेशमी कपडे तर नाहीतच, पण अंग झाकण्यापुरते कपडेही त्यानं मला दिले नाहीत.
श्रीमंताने विचारले,
“तुला पैशाची गरज आहे का ? "
“पैसे मिळाले तर यांपैकी काही गोष्टी मी विकत घेईन.
“ मी पैसे देईन, त्याबद्दल तू तुझी काही वस्तू मला दिली पाहिजेस."
भिकारी म्हणाला,
“सावकार माझी गरिबाची चेष्टा करताय ? तुम्हांला द्यावं असं माझ्यापाशी काय आहे ? "
श्रीमंत म्हणाले, “मला तुझा एक डोळा पाहिजे. देशील ?”
“डोळा ? खुशाल घ्या की !” " काय किंमत घेणार ? "
“शंभर रुपये घेईन!"
“ठीक आहे. दिवाणजी, दया याला शंभर रुपये. "
एकाएकी भिकाऱ्याला वाटले, आपण सांगण्यात काही चूक तर केली नाही ? – तो घाईघाईने म्हणाला, “नाही महाराज. थांबा. मी एक हजार रुपये घेईन. म्हणजे दहा शंभर. "
"काही हरकत नाही. दिवाणजी, दहा शंभर दया.
भिकारी गोंधळला. इतक्या लवकर सौदा ठरतो आहे, तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतोय. दहा शंभर ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी, असे त्याला वाटले.
'महाराज, मी दहा हजार घेईन. "
" ठीक आहे. दिवाणजी याला दहा हजार दया.
आता मात्र भिकारी फार गोंधळला. बाजारात डोळ्यांचा भाव नक्की काय आहे, हे त्याला कळेना. तो पुन्हा ओरडून म्हणाला, “महाराज, माफ करा. मला एक लाख रुपये म्हणायचं होतं. ते चुकून तोंडातून दहा हजार गेलं. "
" काही हरकत नाही. एक लाख घे."
भिकारी गप्प झाला. त्याच्या मनात विचार आला, की एका डोळ्याची किंमत जर एक लाख रुपये, तर काय, दोन डोळे म्हणजे दोन लाख ? दोन कान म्हणजे चार लाख ? एक नाक म्हणजे आणखी एक लाख ? मग डोळे, नाक, कान, हात, पाय- या सगळ्या शरीराची किती किंमत असेल? शिवाय हातापायाचा भाव नक्कीच जास्त असणार. म्हणजे एका एका हाताचे दोन दोन लाख. आणि हे पाय? हे डोके ? त्याचे किती लाख ?
भिकाऱ्याला हिशेब जमेना.
किती लाखांचे हे शरीर आहे, हे त्याला नक्की समजेना. तो शरमला आणि श्रीमंतापुढे बाकून हात जोडून म्हणाला, 'महाराज, मी देवाला फुकट दोष दिला. त्यानं मला घट्टकट्टं शरीर दिलं आहे, म्हणजे पुष्कळ दिलं आहे. माझी ओरड खोटी आहे. क्षमा करा.