BHOGALE JE DUKHA TYALA... by ASHA APARAD
मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या आशा अपराद यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला’ या आत्मचरित्राला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी पुरस्कार, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार असे सात पुरस्कार मिळाले आहेत. मूर्तिमंत जिद्द उभी!... कुरूप, अपशकुनी, पांढऱ्या पायांची, पालीच्या तोंडाची, दळभद्री, रडकी, तुटक्या चपलेच्या तोंडाची. टांग्याच्या टपासारखी मरतुकडी, बिसरी, बेअकली अशी काही विशेषणे घेऊन मुस्लीम समाजातल्या एका मुलीनं आपलं आयुष्य गळ्यातल्या ओढण्यासारखं अेक वर्षे वाहून नेलं. तिच्या ठेचकाळलेल्या जीवनाच्या पूर्वार्धात ना आनंदाचे क्षण आले. ना शरीर वा मनाला विश्रांती लाभली. शिक्षणाला बंदी. त्यातच मन वा शरीराची कोणतीही तयारी नसताना लग्न करून दिलेलं आणि वयाच्या वीस वर्षांच्या आतच पदरात चार मुली. या मुलीनं उभारी तरी धरायची कोणाच्या आधारानं. कारण त्या मुलीवर हा अन्याय कोणी शत्रू, शेजारी, सावत्र आई वा परके नातेवाईक करीत नव्हते, तर खुद्द तिच्या सख्ख्या आईनंच तिचं आयुष्याच आपल्याकडं ‘गहाण’ ठेवलं होतं. तिच्या ‘व्यक्तिमत्त्वा’चा जणू ‘बोन्साय’च करून टाकला होता. त्या मुलीनं वडिलांकडे मदतीसाठी बघावं तर आईनं त्यांचाही पालापाचोळा केलेला. सतत कानांवर पडणाऱ्या तू कुरूप, अपशकुनी आणि पांढऱ्या पायांची अशा शब्दांनी ती घायाळ होत होती. असले टोमणे आई अन्य मुलींना न मारता आपला व वडिलांचाच पाणउतारा का करते या प्रश्नाचा भुंगा पुढे आयुष्यभर काही सोडवता आला नाही. पण एक टप्पा असा येतो की, गुलामीची तिला जाणीव होते, ती शिकते, नोकरी करते. अपमानाचे असंख्य प्रसंग येतात. पण सर्व जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडते... तिच्या मुलींनाही शिक्षाणात गोडी असते आणि तिची सारी स्वप्ने त्या पूर्ण करतात... ज्या आईनं तिचं आयुष्य नकोसं मानलं. त्या आईला तिनं स्वत:च्या घरातून ‘हद्दपार’ केलं असलं तरी देखभाल करण्यात ती कुचराई करीत नाही. तीच आई नंतर लोकांना सांगू लागली, ‘मेरी बडी बेटी पोपेसर हाय. उन्हेच सब मेरा देखतिया.’ खरंच कोण होती ही मुलगी? स्वत्त्वाची जाणीव होताच आपली ‘स्पेस’ तयार करणारी ही मुलगी होती तरी कोण? आशा आपराद हीच ती मुलगी. आता आयुष्याचं अर्धशतक पार केलेल्या आशानं जीवनाचे अनेक रंग अनुभवलेत. त्या अनुभवानं कधी ती थरारली. उद्ध्वस्त झाली संघर्षमय कालखंडाचा हा पट तिनं गहिरेपणानं मांडलाय. संवेदनशील वडील आणि असंवेदनशील आईच्या पोटी जन्मलेली ही आशा वडिलांची आवडती; पण आईची तितकीच नावडती. आशा म्हणते, ‘आईला वस्तू गहाण ठेवून गरज भागविण्याची सवय. तिनं कधी भांडी, दागिने, वडिलांचा लग्नातला जरीचा पटका, कधी मंगळसूत्रही गहाण ठेवलं. तिनं गहाण ठेवलेल्या वस्तू मी सोडवत आले. मला आईपाशी ‘गहाण’ ठेवलेलं आयुष्यही सोडवून घ्यावं लागलं. वडील असेतो आशा शिकत गेली आणि ती नववीत असताना तिचे प्राणप्रिय ‘भई’ मरण पावले. त्याच क्षणी आई पाटी-दप्तर फेकून देऊन तिचं शिक्षणच संपूवन संसाराला जुंपते. ऐन लग्नात सासरच्या मंडळींशी भांडते आणि आशा नवऱ्यासह आईकडेच राहायला लागते. वस्ताद आई त्यांचंही पोतेरं करते. आशाची सारी स्वप्ने आईच्या काळजाच्या दगडावर चक्काचूर होत जातात. धर्म, रूढी, परंपरा दहशत आणि दरारा अशा अनेक दगडांच्या तुरुंगात ती चिणून जाते; पण सभोवतालची चार चांगली माणसं मदतीला धावतात आणि आशाची जडणघडण होते... तिची प्रेरणा घेऊन तिच्या चारही मुली स्वत:च्या पायांवर उभ्या राहतात. नवरेही समजूतदार मिळतात आणि आयुष्याच्या उताराच्या वळणावर तीच आशा त्याच अबोल आणि समजून घेतलेल्या नवऱ्याच्या साथीनं स्वत:च्या गाडी-बंगल्यासह राहते आहे... अलौकिक नात्यानं भोवतालच्या समाजानं जे प्रेम आणि साथ दिली त्या स्नेहसंबंधाचं प्रतीकही पुस्तकातून उमटत राहतं... ही लोकं तरी कोण होती? तिचे शिक्षक, गल्लीतले लोक, कॉलेजातले गुरुवर्य, आधारवड बनलेल्या प्राचार्या लीला पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील, रवींद्र सबनीस, अनेक संस्था, महिला दक्षता समिती आणि असंख्य मायेची माणसं. ती ज्या हिंदू गल्लीत जन्मली आणि वाढली तेथल्या संस्काराने ती कवेळ मुस्लीम न राहता भारतीय मुस्लीम बनली. जाती आणि धर्मभेदाच्या पलीकडच्या समाजाच्या प्रेमातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत गेली... पण त्यासाठी जन्म ते नंतरची पंचवीस वर्षे अक्षरश: नकारात्मक शब्दांचे आसूड आणि अभद्र लेबलं सोसावी लागली. त्या लेबलातून वाट काढण्यासाठी जी धडपड झाली त्या धडपडीची कहाणी म्हणजे ‘भोगले जे दु:ख त्याला... हे पुस्तक. १४ एप्रिल १९५२ रोजी मुस्लीम कुटुंबात कोल्हापुरात आशाचा जन्म झाला. वडील इस्माईल देसाई त्याकाळच्या इंग्रजी विषयातले एम. ए. व इतर भाषांचे जाणकार. इंग्रजांकडे ते दुभाषा आणि खजिनदार म्हणून काम पाहत. स्वातंत्र्यानंतर इंग्रज परतले आणि इकडे नोकरी-जमीन सारेच गेले.