स्त्री-पुरुष नातेसंबंध हा अत्यंत गहन विषय. त्यावर अनेक विचारवंतांनी आपापले विचार, विविध कालखंडात मांडले, तरीही या नातेसंबंधाची उकल अजूनही पुरती कुणाला करता आलेली नाही. नव्या कालखंडात अन् आजूबाजूचं वास्तव बदलत असताना, विस्तारत असताना या नातेसंबंधात नव आयाम दिसू लागतात आणि मग पुन: नव्यानं स्त्री-पुरुष नातेसंबंध आहे तरी काय याचे नवेच निकष सामोरे येऊ लागतात. आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांनी आपल्या ‘अनादि-अनंत’ या कादंबरीमध्ये पुन: एकदा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्वार्ध ‘अनादि’मध्ये नायक रामण्णा, त्यांची अंथरुणाला खिळलेली पत्नी सरला आणि सरलेनेच तिच्या नात्यातील तिला घरकामात मदत व्हावी म्हणून आणलेली तरुणी कुमुद एवढीच तीन पात्रं. रामण्णा हा सृजनशील लेखक, कादंबरीकार. त्याचं सरलावर प्रेम. पण सरलाच्या आजारपणात त्याला तिच्याकडून शारीरिक सुख नाही. मूलही नाही. त्याची आता शक्यताही नाही. सरलाला मात्र तिचं घर मुलाबाळांनी भरलेलं असावं असं वाटतं. त्यासाठी रामण्णानं दुसरं लग्न, तेही कुमुदाशी करावं ही तिची इच्छा. पण तत्पूर्वीच एका मोहाच्या क्षणी रामण्णा आणि कुमुद यांचा शरीरसंबंध होतो. आपण चूक करतोय की बरोबर हा निर्णय होण्यापूर्वीच हे सारं घडतं. यातून प्रश्न निर्माण होतो तो नैतिकतेचा. आद्य रंगाचार्य यांनी या पात्रांच्या मनोवस्थेतून, त्यांच्या विचारातून हा मुद्दा विविध स्तरावर तपासून पाहिला आहे. रामण्णाचं खरं प्रेम कोणतं? सरलेवरचं की शारीरिक उपासमारीतून कुमुदकडे आकर्षिले गेलेलं, कुमुदमध्ये अडकणारं? सरलाच्या मृत्यूनंतर रामण्णा कुमुदशी लग्न करतो. कुमुदही त्यास तयार होते, ती तिच्या पोटात रामण्णाचा अंश वाढत असतो म्हणून की तिला रामण्णा आवडत असतो म्हणून? प्रतारणा कोण कुणाशी करतं? नेमकं प्रेम म्हणजे काय? स्त्री-पुरुष यांच्यातील नात्याचा अर्थ भावनिक पातळीवर श्रेष्ठ की शारीर पातळीवर? लेखक श्रीरंग एके ठिकाणी म्हणतात, ‘हृदयं एक झाली नसता शरीरांना एकत्र आणणं हीच खरी वेश्यावृत्ती, लग्न झालं तरी वेश्यावृत्तीच ना!’ रामण्णश-सरला, रामण्णा-कुमुद या नातेसंबंधांचा विचार करताना श्रीरंग यांनी कालिदास, भवभूती यांच्या काव्याचे दाखले देत त्यांच्या नात्यांचा, वागण्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे. पुराणातील उदाहरणं आणि रामण्णा-कुमुदचा पोरकटपणा यातील साम्य मात्र इथठ ओढून-ताणून आणल्यासारखं, कृतक वाटतं. त्या उदाहरणांनी श्रीरंग यांचा व्यासंग दिसतो, पण रामण्णा-कुमुद ही पात्रं मात्र अ-लौकिक होत नाहीत. तरीही कधी कधी त्यांचे अनुभव तत्त्वज्ञानाच्या पातळीवर व्यक्त होतात. उदा. ‘एकाचं सुखदु:ख दुसऱ्याच्या हातात नसतं’किंवा ‘मनुष्याला ज्या घटना अचानक घडल्या असं वाटतं त्या निसर्गाच्या नियमानुसार घडतात.’ उत्तरार्ध ‘अनंत’मध्ये दहा वर्षानंतरचा कालखंड. त्यात कुमुदनं घर सोडलं. रामण्णाशी संबंध ठेवला नाही. मुलगा मोहन दहा वर्षांचा झाला. आता त्या दोघांमधील एकमेव दुवा ‘मोहन’. पण त्याच्या अकस्मात जाण्यानं रामण्णा आणि कुमुद यांच्या नात्याला काय अर्थ राहिला, असा प्रश्न उपस्थित करून ही कादंबरी संपते. अगदी अपवादानंच यात अलंकार येतात. सुंदर अशी श्रीरंगची निवेदनशैली आहे. प्रारंभी कथानक एकाच मुद्याभोवती घोटाळत राहतं. उत्तरार्धातही तसंच. पात्रांचे स्वाभाविक विस्तार जाणवत नाहीत. स्त्रिया तर हिंदुस्थानी पारंपरिक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार्या, त्यादृष्टीनं यात आधुनिक विचारही जाणवत नाही. उषा देसाई-अविनाश देसाई यांचा अनुवाद उत्कृष्ट. चंद्रमोहन कुळकर्णींचं मुखपृष्ठ आशयानुसार अर्थचित्रासारखं सुबक.