أحدث المنشورات من पुस्तक परिचय (@pustakparichay) على Telegram

منشورات पुस्तक परिचय على Telegram

पुस्तक परिचय
पुस्तक परिचय - तुमची वाचनाची आवड वाढविण्यासाठी येथे चांगल्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्यात येतो.
4,666 مشترك
1,811 صورة
43 فيديو
آخر تحديث 28.02.2025 22:30

أحدث المحتوى الذي تم مشاركته بواسطة पुस्तक परिचय على Telegram


BHAVKALLOL by K. SATYANARAYANA

के. सत्यनारायण यांच्या कथांतील पात्रे, प्रसंग, घटना, निसर्ग, ग्रामीण व निमनागरी जीवनसरणी ही मंड्या, बंगळुरू व आसपासची गावे यामध्ये बंदिस्त झालेली आहे. त्यात चित्रित झालेली कुटुंबव्यवस्था आणि त्यात मुरलेले र्धािमक व पारंपरिक संस्कार हे अस्सल कर्नाटकी आहेत. त्यामुळे या कथांचे स्वरूप कौटुंबिक कथा असेच आहे. काही कथांतून आधुनिक जीवनाचे कवडसे उमटलेले दिसतात. काही परदेशी पाहुणे अचानक उतरून वावरताना दिसतात; पण हे अपवादात्मक आणि कथासंग्रहाच्या मूळ वस्तूला ढळ न पोहचेल या रीतीने! त्यांच्या कथांची निवेदनशैली प्रवाही आहे, ती भरगच्च तपशिलाने सजलेली आहे. काही कथांतील पात्रांचे वागणे आणि त्यांची अभिव्यक्ती अतिशयोक्त वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्या कथांतून प्रादेशिकतेचे वातावरण सतत जाणवत राहते आणि ते साहजिकही आहे. त्याच्या कथांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात वर्णन केलेले कौटुंबिक वातावरण. कुटुंबात एकत्र राहणारी मुलेबाळे, कुटुंबात झडणारे समारंभ, रीतिरिवाजांचे पालन, संसारात रमलेली मुलेबाळे, त्यांच्या येणाऱ्या वार्ता, त्यामुळे आठवणारे पुराणातले समांतर प्रसंग आणि घटना यांचा संभार या कथांतून दिसून येतो.

या आठवड्यातील दुसरे पुस्तक आहे शरद घाग यांचे गाजलेले मराठी नाटक " फुलाला सुगंध मातीचा " 🙏

BHAVGIRI by RAVINDRA DHAMAPURKAR

मृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी कोकणी माणसं भुताला घाबरत नसली, तरी त्यांच्या सभोवतालचे जग व त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा-वेदना-दु:ख, काळजाला पीळ पाडते; कारण कोकणातील निसर्गसमृद्धी जरी आपल्याला वेड लावत असली, तरी परिस्थितीने गांजलेल्या माणसांची दुनिया तिथेही आहेच.गरिबीत दिवस काढूनही कोकणी माणूस काटेरी फणसासारखा आहे. वरून कठोर वाटला तरी त्याच्या हृदयात शहाळं असल्याची जाणीव कायमच दिसते. कोकण म्हणजे पिशाच्चांचं आगर समजलं जातं. मानवी प्रवृत्तीत जसा स्वार्थ-अधाशीवृत्ती दडलेली असते,तीच अतृप्त इच्छा मनात धरून भुतांच्या जगतातील विचित्र असे मानसिक क्रौर्य, बदला आणि अतृप्त आत्म्यांची घालमेल कोकणकथांतून आपल्याला दिसते. भावगिरी पर्वताचे दर्शन मनाला मोहवणारे, त्यामुळे माणूस कोकण प्रेमात पडला नाही तर नवलच! येथील जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयता, गूढगुंजनात्मकता कोकणचे गाणं बनते... मनात रुंजी घालते. 

BHARATIYA SAINIK by SUSHANT SAINI

पालकांच्या इच्छेखातर आयआयटीची परीक्षा दिलेला अर्जुन मनातून भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बाळगतो आहे. एनडीए की आयआयटी या गोंधळात पडलेल्या अर्जुनला शेवटी त्याचं कुटुंबच पाठिंबा देतं. त्याच्या स्वप्नांची वाट मोकळी होते. आणि अर्जुन एनडीएत दाखल होतो. एनडीएच्या प्रशिक्षणानंतर तो सैन्यातील एका गुप्त आणि महत्त्वपूर्ण मिशनचा भाग होतो. त्याच्यासाठी देशसेवा बजावण्याची ही नामी संधी असते. पण तिथल्या वातावरणाने आणि काही घडामोडींनी त्याच्या पुढे अनेक नवी आव्हानं उभी राहतात. आणि देशसेवेत राहण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवरच परिणाम होतो. या वैचारिक दुविधेतून तो तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतानाच दोनशे प्रवाशांना घेऊन जाणार एक विमान अपहृत होतं...आणि अर्जुनपुढे पुन्हा नवा पेच निर्माण होतो.

BHARATIYA SAHITYIK by DR.SUNILKUMAR LAWATE

डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस भारतीय साहित्यिकांचा आस्वादक शैलीत परिचय घडविला आहे. यात हिंदू, उर्दू, मराठी, पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांतील साहित्यिकांचा समाेश आहे. यात सर्वाधिक जास्त असे चौदा साहित्यिक हिंदीतील आहेत.‘सकाळ’ (कोल्हापूर आवृत्ती) मध्ये यातील बहुतेक लेख प्रकाशित झाले आहेत. यातील लेख बहुधा प्रासंगिक कारणांनी लिहिलेले आहेत. तरीही ते लेखकाचे जीवन, व्यक्तित्व आणि साहित्यविशेष यांचे नेमकेपणाने दर्शन घडवतात. स्वत: लेखक हिंदीचे प्राध्यापक असल्यामुळे हिंदीतील लेखकांवरील लेख अधिक अभ्यासपूर्ण उतरले आहेत. त्यात लेखकांच्या कलाकृतींची ओळख घडवून देताना वाचकांना लेखकाचे वाङ्मयीन परंपरेतील स्थान लक्षात आणून देण्याची भूमिकाही आहे. ‘‘मैथिलीशरण गुप्तांची साहित्यसाधना ही एकविसाव्या शतकातील भारताला अंतर्मुख होण्याची एक संधी आहे,’’ हे डॉ. लवटे यांचे भाष्य मार्मिक आहे. यात महादेवी वर्मा, अमृता प्रीतम, निर्मल वर्मा, यू.आर.अनंतमूर्ती अशा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकारांबरोबर पटकथाकार डॉ. राही मासूम रझा, परदेशी हिंदी कवी ओदोलेन स्मेकल, रस्त्यावरचा रंगकर्मी सफदर हाश्मी, ‘मराठी कबीर’ नारायण सुर्वे अशा महत्त्वाच्या लेखकांचाही समावेश आहे. डॉ. लवटे यांची संवेदनशीलता विविध विचारसरणींच्या साहित्यिकांचे वाङ्मयीन कर्तुत्व जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता धारण करू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र ‘भारतीय साहित्यिक’ या शीर्षकाखालील पुस्तकात सुधाकर प्रभूंचा समावेश खटकतो. खरे तर यात इतर भारतीय भाषांमधील राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण स्थान असलेले काही साहित्यिक समाविष्ट करायला हवे होते. त्यांच्या अनुवादित साहित्याबाबतची सूचीही दिली असती तर पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले असते. आहे त्या स्वरूपात हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांची जिज्ञासा वाढवणारे आणि अनुवादकांना मार्गदर्शक ठरणारे म्हणून महत्त्वाचे आहे.

आजचं पुस्तक आहे डॉ.शैला लोहीया यांचा कथासंग्रह " कथाली " 🙏

BHANDARBHOG by RAJAN GAVAS

भारतीय समाज पूर्णतः जातीव्यवस्था आणि रूढी-परंपरांनी पोखरला गेलाय. हे फारच भयाण व अस्वस्थ करणारं आहे. या विदारक जातीव्यवस्थेचं चित्रण अनेक दिग्गजांनी केलंय, अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे पासून ते हल्ली अलिकडचं शरणकुमार लिंबाळे वगैरेपर्यंत या जातिव्यवस्थेची पाळंमुळं थोडीफार आता सैलही होताहेत. पण अजून बरच काही होणं आवश्यक आहे, अजूनहि बरेच आदिवासी समाज आहेत ज्यांना तर हेही माहित नाही कि ते स्वतंत्र्य आहेत, अजूनही त्यांची दैना संपलेली नाही. हे कमी कि काय म्हणून बऱ्याच घाणेरड्या रूढी - परंपरांनी वेढलंय, यात देव-देवस्की, पशु बळी, नर बळी, जोगते-जोगतिणी आणि बरंच काही ..... :(. या सगळ्यात भरडला जाणारा सर्वसामान्य माणूस, जो जातीव्यवस्थेचं खालचं टोक आहे. असो, यात जोगते-जोगतिणी हे बऱ्याच जातीतले असतात, तर हे जोगते-जोगतिणी होतात कसे? तर केसात केसांची जट सापडली तर ती देवीची, म्हणून तीला भंडारा लावून पुजलं जातं आणि तीला जोगतीण म्हणून सोडलं जातं आणि सांगितलं जातं कि रोज वडाचा-पिंपळाचा चीक केसाला लावून त्यावर भंडारा टाका. म्हणजे होत काय कि हि छोटी असणारी बट कालगणिक वाढत जाते. तर आजारी मुलांना / पुरुषांना बरं व्हावं म्हणून भंडारा लावून देवाला सोडलं जातं. एकदा यांना देवार्पित केलं कि पुन्हा आयुष्यभर त्यातून सुटका नाही, त्यातून मृत्यूच सोडवून नेतो. याना कोणी वाली नसतो, नुसती आयुष्यभर फरफट चालू असते. किमान जोगतीणीला कुणी तरी रखेल म्हणून ठेवतो, तिला हवं तेव्हा सोडून देतो. तीच्या पोटात गर्भ राहिला तर पाडून टाकतात वा नशिबानं जन्माला तर कुठेही तो मांसाचा जिवंत गोळा कुठंही उकिरड्यावर फेकला जातो त्यातून, तो वाचला-जगाला तर तो एखाद्या मेळ्यात चौंडकं वाजवत फिरतो, भिकारी होतो. जोगतीण मेल्यावर तीचा अंत्यविधी तरी गावकरी करतात. पण जोगत्याला तर मेल्यावर कुणी खांदा द्यायलाही तयार होत नाही कारण त्यांना अप्रतिष्ठेची भीती असते.लेखकानं या जीवनाची समस्या मोठ्या ताकदीनं या कादंबरीत मांडली आहे. जोगत्याच्या जीवनाबरोबरच चौंडक्या, मेळ्यातल्या जोगतिणी यांचं एक विश्वच या कादंबरीनं वाचकासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचकाला सुन्न करून सोडते, विचार करावयास लावते. हेच कादंबरीचं यश आहे.

BHALYA DILACHA MANUS by JACK SCHAEFER

पाहुण्या माणसाची गोष्ट... ‘भल्या दिलाचा माणूस’ या पुस्तकचे लेखक आहेत जॅक शॅफिर. सातेक वर्षांच्या बिट्टूच्या घरी एक दिवस अनोळखी पाहुणा अवतरतो. भारदस्त शरीरयष्टी आणि डोक्यावर रूबाबदार हॅट असणारा घोडेस्वार (शेन) बिट्टूच्या घरच्या पाहुणचाराने जणू कुटुंबाचा सदस्यच होऊन जातो. पण तरीही त्याच्याभोवतीचं गूढ वलय तसंच असतं. हा पाहुणा त्या घरच्या सुखदु:खांसोबत तिथली संकटंही स्वत:च्या खांद्यावर पेलतो. बिट्टूच्या कुटुंबाच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या जमीनदाराची त्या कुटुंबप्रमुखावर मारेकरी घालण्याची योजना तो हाणून पाडतो आणि त्या जमीनदारालाही संपवतो. बिट्टूसोबत तर त्याचं खास जिवाभावाचं नातं जडतं. अभिजात अमेरिकन साहित्यातील सर्वांत रोमॅन्टिक हिरो ठरलेला हा शेन आणि बिट्टूच्या कुटुंबाच्या नितळ स्नेहाची ही हृद्य कहाणी... मनाला भिडणारी.प्रभावी कथा, वेगवान घटनांची मालिका तसेच जुन्या अमेरिकेच्या ग्रामीण भागातील वातावरण या सगळ्यामुळे ही कादंबरी रम्य झाली आहे.

BENJAMIN FRANKLIN by BENJAMIN FRANKLIN

प्रेरणादायी चरित्र... काही माणसं अशी असतात की, जीवनाची निश्चित अशी रूपरेषा त्यांनी आखलेली नसते. जीवन जसं समोर येईल त्या पद्धतीने ती वागत जातात; पण जीवनाशी अशी टक्कर देताना ती बहुआयामी होतात. बेंजामिन फ्रँकलिन हे अशा लोकांपैकीच एक. ‘बेंजामिन फ्रँकलन’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या बहुआयामित्वाचं दर्शन घडवतं. लेविस लिअरी यांनी हे आत्मचरित्र वाचकांसमोर आणलं आहे. मराठीत अनुवाद सई साने यांनी केला आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म १७०६ मध्ये बोस्टन येथे झाला. त्यांचे वडील साबण, मेणबत्त्या इत्यादी तयार करत असत. बेंजामिन हे जोशुआ फ्रँकलिन यांच्या १७ अपत्यांपैकी १५ वे अपत्य होते. अगदी लहान वयातच त्यांना त्यांच्या भावाच्या- जेम्स यांच्या- मुद्रणालयात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागले; परंतु भावाशी न पटल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि ते फिलाडेल्फियाला निघून गेले. भावाच्या वृत्तपत्रात त्यांनी थोडे लेखन केले. ती त्यांची वृत्तपत्रलेखनाची सुरुवात होय. फिलाडेल्फियाला गेल्यावर त्यांनी सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी धरली. तिथे त्यांच्या अनेक ओळखी झाल्या. तरुण फ्रँकलिनच्या वृत्तीची धडाडी आणि चमक गव्हर्नरच्या नजरेत भरली आणि त्यांनी लहान वयातच फ्रँकलिनला स्वत:चा छापखाना काढण्याची कल्पना सुचवली. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू असेही सुचवले. फ्रँकलिनच्या वडिलांचा त्यांच्या लहान वयामुळे या गोष्टीला विरोध होता. तरीही फ्रँकलिन इंग्लंडला गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गव्हर्नर साहेबांनी त्यांना फसवले. तिथे त्यांनी एका मुद्रकाकडे नोकरी केली. १७२६ मध्ये डनहॅम नावाच्या आपल्या ज्येष्ठ मित्राबरोबर त्यांचा व्यापार सांभाळावा या कल्पनेने ते परत आले; परंतु लवकरच डनहॅमचे निधन झाल्यावर त्यांनी परत किमरकडे नोकरी धरली. दोन वर्षांनी किमरचे पॅनसिल्व्हानिया गॅझेट ताब्यात घेऊन त्यांनी ते वृत्तपत्र यशस्वीरीत्या चालवले. त्यांची जुनी प्रेयसी डेबोरा रीड हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. पहिला मुलगा विल्यम यालाच उद्देशून या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहिला आहे. १७३० च्या दशकात फ्रँकलिन यांनी अनेक छोटी-मोठी पदं भूषवली. सरकारचे छपाईचे काम त्यांच्याकडे होते. त्याच वेळी त्यांनी आपल्या ‘पुअर रिचर्ड्स अ‍ॅलमनॅक’ लिहायला सुरुवात केली. ते फिलाडेल्फियाचे पोस्टमास्तर बनले. या दशकाच्या शेवटी त्यांनी फ्रँकलिन स्टोव्हची निर्मिती केली. १७४० च्या दशकात त्यांनी अनेक कामं हातात घेतली, ज्यात अग्निशमन दल, पोलीस खातं, पॅनसिल्व्हानिया विश्वविद्यालय, रस्तेसफाई अभियान आणि इतर छोट्या सार्वजनिक कामांचा समावेश आहे. १७४८ मध्ये ते मुद्रणाच्या व्यवसायातून निवृत्त झाले आणि त्यांनी विद्युतशक्तीच्या वैज्ञानिक प्रयोगांवर आपले लक्ष केंद्रित केले. १७५३ मध्ये त्यांना हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. पुढल्या वर्षी जेव्हा इंग्लंड आणि फ्रांस यांच्यातील युद्ध सुरू झाले. (फ्रेंच आणि इंडियन युद्ध), तेव्हा वसाहतींच्या संरक्षणाकरता लागणारा निधी कसा गोळा करता येईल, त्याची योजना फ्रँकलिन यांनी आखायला सुरुवात केली. प्रत्यक्ष युद्धातही त्यांचा सहभाग मोठा आहे. सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्ले बांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या काळातील ते एक उत्तम राजनैतिक मुत्सद्दी होते. हे आत्मचरित्र १७५७ च्या घटनांपाशी येऊन अचानकच थांबतं. ते अपूर्णच राहिलं. हे आत्मचरित्र तीन वेगवेगळ्या काळात फ्रँकलिननी लिहिलं– १७७१ मध्ये इंग्लंड येथे, १७८३ मध्ये फ्रांस मध्ये आणि १७८८ मध्ये अमेरिकेत. ते पूर्ण करण्यापूर्वीच फ्रँकलिन यांचा १७९० मध्ये मृत्यू झाला. एक माणूस किती प्रकारची कामं करू शकतो, त्याचा प्रत्यय हे आत्मचरित्र वाचल्यावर येतो. अर्थातच हे आत्मचरित्र प्रेरणादायक आहे.

BENDBAJA by D.M.MIRASDAR

अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे "सदगुण म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल भरपूर प्रमाणात असतो. प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्किल माणूस दडलेला असतो आणि तो हा कच्चा माल बरोब्बर हेरून त्यातली विसंगती खेळकर पद्धतीने शब्दबद्ध करतो. पंढरपूरसारख्या अर्धग्रामीण भागात बालपण घालवलेल्या द..मा. मिरासदारांना असा कच्चा माल भरपूर प्रमाणात गवसला असल्यास नवल नाही. अशा "सदगुणी माणसांचे वेचक अनुभव ते आपल्या खुमासदार शौलीत कथन करतात. तेहा सामान्यांना अगदी सा­ध्या सु­ध्या वाटणाया"ना सुद्धा मजेशीर परिमाण घेऊन आपल्यासमोर येतात. द.मां.च्या लेखनाचे एक वौशिष्ट्य असे की ते केवळ इतरांच्याच अनुभवाकडे मिश्किल नजरेने पाहतात असे नहे, तर स्वत:चीही फिरकी घेतात. अशा स्वत:च्या घेतलेल्या अनेक फिरक्यांचे हसवणारे सूर या "बेंडबाजा" म­धुन ऐकू येतील.