*महाराष्ट्राचे लाडके भाई*
*पु.ल.देशपांडे*.
*निधन : १२ जून,२०००*
प्रत्येक मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव म्हणजे पु.ल.देशपांडे. जगभर जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे पु.ल. देखील पोचले आहेतच. अगदी दक्षिण ध्रुवावर असलेल्या दक्षिण गंगोत्री या भारतीय तळावर असलेल्या मराठी माणसांनी सोबत पुलंची पुस्तके नेली आहेत. असे भाग्य अन्य कोणाला लाभले नसावे. त्यांच्या साहित्या व्यतिरिक्त, त्यांचे किस्से ,कोट्या आणि विचार,त्याच बरोबर त्यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या काही गाण्यांबद्दल माहिती त्यांच्या स्मृतीदिनी आठवणींचा जागर करताना देतो आहे.
*कोट्या*
*मामा नावाची गंमत*
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’
*भारती मालवणकर*
पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.
*माणिक वर्मा*
माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.नी केलेल्या खुमासदार कोटीमुळे धमाल उडाली .‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल.पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की.
*किस्से*
*गुळाचा गणपती*
पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती' त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा,पटकथा,संवाद,गीते, संगीत आणि दिग्दर्शन,एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला.
*प्रतिशब्द*
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘एअर होस्टेस ला आपण ‘हवाई सुंदरी’ म्हणतो,तर नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘वाढपी’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी’ का म्हणू नये ?’
*संजय उवाच*
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला’
*माझ्या बंधू आणि भगिनींनो*
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.
भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,‘ सभ्य स्त्रीपुरुष हो... मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे.
’त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,‘बंधू आणि भगिनींनो... समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘ बंधू आणि भगिनींनो... ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘ भाई ’ म्हणते ’
*द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती*
तुमचं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारल्यावर ते म्हणाले . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय, असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो, ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती
*हवाई गंधर्व*
पंडित भीमसेन जोशी यांचे साऱ्या देशभर आणि परदेशात सारखे दौरे सुरु असायचे. त्या मुळे त्यांच्या वारंवार होणाऱ्या विमानप्रवासांमुळे त्यांना पु. ल. देशपांडे यांनी गमतीने ‘हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती.
*पु.लं चे विचार*
जगा इतके की आयुष्य कमी पडेल. हसा इतके की आनंद कमी पडेल.
भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.
खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे देखील हतबल होतात.
मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात
*भेटी आणि गाठी*