-------------------------------------------
भारताच्या कृषीक्षेत्राला स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात डॉ. स्वामीनाथन यांच्या इतकाच किंबहुना जास्त मोठा वाटा डॉ. वर्गीस कुरीयन यांचा आहे. त्यांनी भारतात सहकाराच्या माध्यमातून धवलक्रांती यशस्वी केली. तिच्यातल्या अनेक बाबी अनुकरणीय आहेत पण ही धवलक्रांती केवळ दुधापुरतीच मर्यादित राहिली नाही तर शेतकर्यांना चांगला जोडधंदा मिळाल्याने शेती व्यवसायालाही स्थैर्य लाभले.
कुरीयन हे मुळात केरळातील राहणारे. पण त्यांनी गुजरातेत येऊन धवल क्रांतीसाठी जीवन अर्पण केले. सध्या देशातील काही राज्यात प्रादेशिक आणि जातीय भावनांच्या आधारावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याची अहमहमिका लागली असताना केरळातील एक ख्रिश्चन माणूस गुजरातेत जातो आणि पूर्ण देशाचे चित्र बदलून टाकणारा एक प्रयोग करतो ही विशेष बाब म्हणावी लागेल. डॉ. कुरियन यांनी 1949 मध्ये या प्रयोगाचा पाया घातला. त्यांनी दूग्ध व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला त्या काळात शेतकर्यांमध्ये व्यावसायिक वृत्तीच नव्हती. त्यामुळे त्यांना या व्यवसायाची कल्पना देणे तसेच प्रोत्साहन देणे ही बाबच मोठी अवघड होती. मुख्य म्हणजे त्यावेळी लोकातही दूध विकत घेण्याची फार ऐपत नव्हती. कारण देशातील बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती अतीशय कमी होती. त्या काळात कुरियन यांनी धाडसाने धवलक्रांतीचा उपक्रम हाती घेतला. याच काळात काय पण नंतरची 10 ते 15 वर्षे दूध विक्री हा संघटित व्यवसाय होऊ शकेल असे कोणाला वाटत नव्हते. पण कुरियन यांना तसा विश्वास वाटत होता. या विश्वासावरच त्यांनी या क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली.
उच्च विद्याविभूषित असलेले कुरीयन भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेत प्रशिक्षणाला गेले होते. तिथून आल्यानंतर त्यांना गुजरातेत एका प्रकल्पाचे प्रमुख म्हणून पाठवण्यात आले. दुधावर प्रक्रिया करून काही पदार्थ तयार करण्यासंबंधातला तो प्रकल्प होता. त्या निमित्ताने कुरियन गुजरातेत आले आणि त्यांना पश्चात्ताप वाटायला लागला. कारण गुजरातेतील उकाडा त्यांना सहन होईना. त्यावेळी त्यांची नियुक्ती खेडा जिल्ह्यात होती. खेडा हा भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जिल्हा. सध्या गाजत असलेले गोध्रा हे याच जिल्ह्यात आहे. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात शेतकर्यांच्या संघटना स्थापन झाल्या होत्या आणि शेतकर्यांची काही आंदोलने होऊन नवे उपक्रमही राबवले होते. त्यातूनच खेडा जिल्हा दूध उत्पादक संघ स्थापन झाला होता. या संघाचे काम त्रिभुवनदास पटेल हे पहात. कुरियन यांनी गुजरातेतील उकाडय़ाने हैराण होऊन अन्यत्र जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तसा अर्ज केंद्र सरकारला पाठवला. केंद्र सरकारने तो मंजूरही केला. पण सरकारचे हे उत्तर पोहोचण्याच्या दरम्यानच्या काळात त्रिभुवनदास आणि कुरियन यांची भेट झाली. त्यांनी कुरियन यांना गुजरातेतच राहून काम करण्याची विनंती केली. कुरियन यांनीही तसा निर्णय घेऊन गुजरात हींच आपली कर्मभूमी ठरवली. त्यांनी काम सुरू केले तेव्हा या सहकारी संस्थेची सदस्यसंख्या होती अवघी
दोन’. दोन सदस्यांपासून सुरूवात करून त्यांनी हा वटवृक्ष किती मोठा केला हे आपण पहातच आहोत. कुरियन यांनी
अमूल’ला जगात ख्याती मिळवून दिली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रयोगाचे कौतुक केले होते. `जय जवान, जय किसान’ असा नारा देणार्या पंतप्रधान लालबहादूर शात्री यांनी कुरियन यांना सक्रिय मदत केली. कुरियन यांच्या कौशल्याचा आणि नेतृत्वाचा फायदा देशाला झाला पाहिजे या कल्पनेतून शास्त्रींनी कुरियन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) या संस्थेची स्थापना केली.कुरियन यांनी या संस्थेच्या माध्यमातून गुजरातेच्या धर्तीवर अन्यही राज्यात दुग्ध व्यवसायाला चालना दिली. त्यांनी देशभरात धवलक्रांती अर्थात ऑपरेशन फ्लड असा उपक्रम राबवला. त्यातून महाराष्ट्रातही श्वेतक्रांती झाली. तिलाच दुधाचा महापूर असे नाव देण्यात आले होते. 2000 मध्ये देशात एवढे दुग्धोत्पादन झाले होते की भारत हा दुग्धोत्पादनात जगात दुसर्या क्रमांकाचा देश ठरला होता. देशातील दुधाचे उत्पादन जगातील दूध उत्पादनाच्या 17 टक्के असल्याचे दिसून आले होते. कुरियन यांनी गुजरातेतही दूध उत्पादन करणार्या सहकारी संस्थांचा महासंघ स्थापन केला होता. त्या संघाचे ते 33 वर्षे अध्यक्ष होते. कुरियन यांचे हे कार्य गुजरातेत समृद्धी आणण्यास कारणीभूत ठरले. आज मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातने शेतीत किती प्रगती केली याच्या बर्याच बढाया मारत असतात. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी या व्यवसायाला स्थैर्य मिळाल्यामुळेच तिथली शेती सुधारली आहे.