पुस्तक परिचय

@pustakparichay


पुस्तक परिचय - तुमची वाचनाची आवड वाढविण्यासाठी येथे चांगल्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्यात येतो.

पुस्तक परिचय

22 Oct, 08:53


ADGAL by L. S. JADHAV

बँकेतून सेवानिवृत्त झालेले जुगा काळे हे ‘अडगळ’ या कादंबरीचे नायक. वयाच्या सहासष्टीनंतर ते लिहायला लागतात. अल्पावधीत विपुल लेखन होते. सन्मान होतो. नावलौकिकही मिळतो; पण बायको आणि मुलांना त्यांच्या लेखनात, त्यांना मिळालेल्या मानसन्मानांमध्ये रस नाही. सेवानिवृत्तीनंतर माजी मंत्री व विद्यमान खासदार मोरे गुरुजींच्या शिक्षण संस्थेचं काम ते निरलसपणे करत असतात; पण त्या संस्थेतून त्यांना पद्धतशीरपणे बाहेर काढलं जातं. वस्तीशी असलेलं काळ्यांचं नातं, त्यांची समाजसेवा मुलांना रुचत नाही. वयाच्या या टप्प्यावर आपण घरातली अडगळ आहोत, असं काळ्यांना वाटायला लागतं. मसणजोगी समाजात जन्मलेले काळे दारिद्य्रात, अवतीभवतीच्या असंस्कृत वातावरणात वाढतात; पण शिक्षण आणि संवेद्य मन याच्या जोरावर ते व्यावहारिक आणि आत्मिक उन्नती करून घेतात. तरी समाजमन आणि व्यक्तिमन याचे गूढ व्यापार त्यांना प्रश्नांकित करतात आणि चिंतन करायला भाग पाडतात. दलित आणि दलितेतर या संबंधाचा माणूस म्हणून घेतलेला शोध आणि त्या अनुषंगाने प्रकटलेलं चिंतन, यासाठी ‘अडगळ’ जरूर वाचायला हवी.

पुस्तक परिचय

21 Oct, 08:23


ADBHUT SHAKTINCHE MAYAJAL by BAL BHAGWAT

"आपल्या या सृष्टीवर आपल्याबरोबरच एका अमानवी, अदृश्य शक्तीचेही अस्तित्व असल्याचे सतत जाणवत असते. हे अस्तित्व नानाविध प्रकारांनी प्रचीत होत राहते. बुद्धिप्रामाण्याच्या आधारे त्याचा शोध विफल ठरतो. तर्कसंगती निष्फळ ठरते. तरीही या शक्तीचे अस्तित्व नाकारता येणे अवघड असते. जगातील विविध देशांत या अद्भुत शक्तीने आपले मायाजाल कसे पसरवले आहे, याचे वेगवेगळ्या कामांतील, वेगवेगळ्या चित्तचक्षुचमत्कारिक अनुभवांचे चित्रण या ग्रंथात आढळेल. त्यांवरून निष्कर्ष तुम्हीच काढावयाचा आहे. "

पुस्तक परिचय

20 Oct, 10:27


ADAM by RATNAKAR MATKARI

पुस्तकाचे नाव : अ‍ॅडम, लेखक :रत्नाकर मतकरी .आजवर मानवी जीवनातल्या पैलूं वर बरीच पुस्तकं लिहिली गेली. पण लैंगिकतेविषयी भाष्य करणारी पुस्तकं कमीच ! अ‍ॅडम त्यापैकीच एक . रत्नाकर मतकरी यांच्या दमदार लेखणीतून सत्यात आलेलं हे एक धाडस... या कादंबरचे नाव बायबल मधील एक दंतकथेवरुन देण्यात आलं आहे.अ‍ॅडम,जो की परमेश्वराने निर्माण केलेला पहिला पुरुष होता त्याने देवाच्या बागेतील फळं खाल्लं आणि तो , मानवजात आणि भूमी शापित झाली अशी ती दंतकथा.. परमेश्वराने बजावून सुद्धा त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याने ते फळ खाल्ले आणि जीवनात दुःख घेऊन आला अशी काहीशी ती दंतकथा.. या नावाचा वापर का केला हे तुम्हाला ही कादंबरी वाचल्यावर कळेलच.. ही कादंबरी म्हणजे प्रत्येक पुरुषाची कहाणी आहे. न कळत्या वयात लैंगिकतेविषयी , स्त्रिदेहाविषयी असणारी ओढ , त्या प्रश्नांची योग्य उत्तर न मिळाल्याने झालेली घुसमट , पुढे आयुष्यात बघाव्या लागणाऱ्या स्त्रीस्वाभवाच्या छटा हे सारं काही या कादंबरीमध्ये व्यवस्थित विस्तृत केलं आहे.. आपल्या समाजात नेहमीच पुरुषांना कामातूर , लंपट आणि संभोगाला आसुसलेले मानल जात आणि स्त्रियांना विनय आणि शिलाची मूर्ती.पण वास्तवात हे १०० टक्के खरे असेलच असं नाही. आपल्याकडे मुलगा आणि मुलीच्या जडणघडणीमध्ये फरक असतो आणि तोच फरक पुढे पर्यंत कॅरी केला जातो. त्यामुळे कदाचित पुरुष जातीची ही प्रतिभा सगळ्यांना खरी वाटते. पण जर खरंच पुरुषाला स्वतः कडे पाहण्याचा आरसा हवा असेल तर ही कादंबरी योग्य ठरेल. ही गोष्ट जरी एका नायकाची असली तर त्याच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या स्त्रिया या कादंबरीत त्यांचं अस्तित्व अधोरेखित करून जातात. त्याच्या आईपासून ते त्याच्या प्रेयसी आणि पत्नी पर्यंत असणाऱ्या त्या नात्यांना लेखकांनी वास्तवतेचे भिंगातून मांडले आहे . एका पेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध आला की पुरुषाला चैनी , विलासी किंवा स्त्रीलंपट आहे असा शिक्का मारला जातो प्रत्यक्षात मात्र असे अनेक नॉर्मल पुरुष आपल्याच आजूबाजूला असतात. आपणच खोट्या सभ्यतेचा मुखवटा पांघरूण मानवी मनाच्या झेपेला चारित्र्यहीन ठरवून मोकळे होतो.. या कादंबरीवर अश्लीलतेचा उघड आविष्कार वगैरे म्हणत टीका झाली आहे. लोकांना सत्य रुचत नाही म्हणतात ना ते खरंच आहे. खरंच प्रत्येक वेळी स्त्रीवादी लोक पुरुषी मानसिकतेवर आवाज उठवत असतात . किमान पुरुषाची मानसिकता काय असते हे समजून घ्यायचे असेल तर नक्की एकदा तरी ही कादंबरी वाचा.

पुस्तक परिचय

19 Oct, 02:59


ACHARYA ATRE - BARA GAVCHE PANI by BABURAO KANADE

आचार्य अत्रे आणि विविध गावं यांच्या नात्याचा वेध... आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. साहित्य, नाटक, चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व, राजकारण, शिक्षण, समाजकारण आदी विविध पैलूंद्वारे त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. महाराष्ट्राच ‘सांस्कृतिक राजदूत’ अशीच त्यांची ओळख होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन, व्याख्यानं, चित्रीकरण, नाटकांचे दौरे आदी कारणांमुळे पायाला भिंगरी लावल्यासारखा त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. इतकंच काय; पण देश-परदेशांतही ते अनेकदा गेले. या निमित्त त्यांचा विविध शहरांशी-गावांशी संबंध आला. त्यातून त्यांचे अनेक ठिकाणांशी ऋणानुबंध जुळले. नेमक्या या नात्यांचा वेध अ‍ॅड बाबुराव कानडे यांनी ‘आचार्य अत्रे - बारा गावचं पाणी’ या पुस्तकांद्वारे घेतला आहे. बेळगाव, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा, वाई, तुळजापूर, पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली आदी शहरांशी आचार्य अत्रे यांचे नातेसंबंध यात उलगडून दाखवण्यात आले आहेत. ‘बेळगाव - महाराष्ट्राचे हृदय’ या लेखात बेळगावविषयी वाटणारी आत्मियता आणि जिव्हाळा आहे. सन १९४६ मध्ये तिथं झालेल्या साहित्य संमेलनाद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं रणशिंग अत्रे यांनी फुंकलं. ‘बेळगाव महाराष्ट्राचे हृदय आहे आणि मुंबई मस्तक आहे,’ असं म्हणत एखाद्या शूर शिलेदारासारखं लेखणी आणि वाणीद्वारे आचार्य अत्रे यांनी केलेल्या रोमहर्षक लढ्याचं वर्णन यात आहे. महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव म्हणून गोव्याला ओळखलं जातं. गोव्यावर अत्रे यांचं नि:स्सीम प्रेम होतं. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्रे यांनी उडी घेतली. त्यासाठी त्यांची लेखणी ‘नवयुग’मधून आग ओकत होती. त्यांच्या वाणीला धार चढली होती. गोव्यासंबंधीच्या त्यांच्या भाषणांचा आणि लेखांचा एक मोठा ग्रंथ होईल, एवढं त्यांचं योगदान आहे. या साऱ्या बाबी गोव्यावरच्या लेखात आहेत. पुण्याविषयी अत्रे यांना मोठी आत्मीयता होती. नगरसेवकपदापासून ते लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुका अत्रे पुण्यात लढले. भांबुर्डाचं शिवाजीनगर तर रे मार्केटचे महात्मा फुले मार्केट असं नामकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभेची निवडणूक पुण्यात ते हरले. त्याचवेळी विधनसभेची निवडणूक ते मुंबईतून जिंकले. त्यावेळी ‘आईने मारले; पण मावशीने तारले’ असे उद्गार त्यांनी काढले होते. पुण्याविषयी अशा अनेक आठवणी ‘पुणे- माझी आई - सांस्कृतिक कर्मभूमी’ या लेखात जागवल्या आहेत. आचार्य अत्रे यांचं कोल्हापूरशी नातं चित्रपटांमुळे आणखी दृढ झालं. ‘ब्रह्मचारी’, ‘वसंतसेना’, ‘महात्मा फुले’ या चित्रपटांसंदर्भातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. तसंच बाबुराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, बाबा कदम, शिवाजी सावंत आदींविषयीच्या आठवणींनाही उजाळा ‘कोल्हापूर नव्हे कलापूर’ या लेखात देण्यात आला आहे. सासवडमध्ये अत्रे यांचं बालपण गेलं. त्यावेळच्या अनेक आठवणी, गंमतीजमती आहेत. उनाडक्या, चेष्टा, चकाट्या, नकला यांना ऊत आला होता. त्यावर ‘शक्ती आणि भक्तीचा संगम - सासवड जन्मभूमी’ या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘मी लहानसहान मंडळींशी मैत्री करत नसतो. खंडाळ्यांच्या डोंगर आणि मुंबईचा सागर हीच माझी खरी मित्रमंडळी,’ असं आचार्य अत्रे म्हणत. त्यामुळंच खंडाळा इथला राजमाची बंगला हे त्यांचं एक आवडतं ठिकाण होतं. इथं रंगलेल्या मैफली, नवोदित साहित्यकांचा मेळा, मान्यवरांच्या गाठीभेटी यामुळं हा बंगला अत्रे यांच्या जीवनात उत्साहाचा झरा होता. एका बंगल्याविषयीच्या आठवणी खूप रंजक झाल्या आहेत. आचार्य अत्रे यांचे अभ्यासक अशी अ‍ॅड. कानडे यांची ओळख आहे. खरं तर आचार्य अत्रे यांना ते आपलं दैवतच मानतात. त्याच अनुषंगानं त्यांनी हा लेखनप्रपंच केला आहे. अत्रे यांचा अनेक गावांशी - शहरांशी ऋणानुबंध जुळला. तिथल्या आठवणींना कानडे यांनी एका धाग्यात गुंफलं आहे, हा अतिशय स्तुत्य प्रयोग आहे. खरं तर ही गावंच आचार्य अत्रे यांच्या आठवणी सांगत आहेत, असा भास आपल्याला होतो, इतकं प्रत्ययकारी लेखन कानडे यांनी केलं आहे. मात्र, हे करत असताना आचार्य अत्रे यांच्याशी ज्यांचे वादविवाद झाले, त्यांनाही कानडे यांनी झोडपून काढलं आहे. अत्रे यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलं असल्यामुळं हे झालं असावं, असं वाटतं. मात्र, त्यांनी हे टाळायला हवं होतं, असं वाटतं. अत्रे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी तर हे पुस्तक वाचावंच, शिवाय ज्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ, संयुक्त महाराष्ट्र यांविषयी यांविषयी आत्मियता आहे, त्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या पुस्तकातून निश्चित होते, एवढं नक्की! 

पुस्तक परिचय

18 Oct, 06:51


ABHOGI by RANJEET DESAI

आयुष्यभर कितीही सुख मिळालं तरी भुकेला असतो, तो कलावंत. कारण खऱ्या कलावंताची सुखाची व्याख्या काहीतरी वेगळीच असते ना.. त्याच्यासाठी कलेतून मिळणारे दाम नाही तर कलेला मिळणारी दाद महत्त्वाची असते, तीच त्याची भूक असते. ती भूक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत कलावंत जिवंत असतो. कलावंताचा जन्म तेवढा सोप्पा नव्हे, याची प्रचिती येते ती रणजित देसाईंच्या या कादंबरीतून... प्रेमात झुरण्यापेक्षा कलेसाठी झुरून मरणारे कलाकार पाहायला मिळतात ते या कादंबरीत... प्रत्येक कलावंताने वाचावी अशी कादंबरी.घराणं आणि आविष्कार जन्मतो गायकाच्या गळ्यातून! महत्त्वाचा असतो, तो सूर! आवाज! आणि त्या कलावंतांची फेक! एकाच घराण्याच्या दहा गायकांची गाणी ऐकली, तर नव्या माणसाला ते घराणं कळेल का? काहीतरी गोंधळ होतो. काही समजत नाही. सुरानं बद्ध झालेली. तीन सप्तकांच्या पलीकडे जाता येत नाही. वाटतं! त्या पलीकडे जावं. नवे सूर, नवे अंदाज गाठावेत. नवे राग जन्माला यावेत. पाठीमागच्या लोकांनी घोटण्यासाठी नव्हे. त्यांनी तसंच काहीतरी निर्माण करावं, म्हणून! ते नवं शोधायला नवे पंख हवेत. सुरवंट आपला कोश बांधतं. आणि नंतर त्यातून फुलपाखरू जन्मतं. या फुलपाखराचा जन्म कलावंताला लाभत नसला, तर त्या कलावंताच्या जीवनाला अर्थ काय? सगळं सुख भोगायला असूनही ‘अभोगी’ राहिलेल्या कलावंताची रणजित देसाईंनी रेखाटलेली भावपूर्ण कथा.

पुस्तक परिचय

17 Oct, 07:06


ABHAL by SHANKAR PATIL

शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे लेणे आहे. त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी! त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही; त्यामागे सामाजिक जाणीव आहे. यांच्या कथेनिर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे त्यांची कथा चिंतनाच्या डोळ्यातूनच जन्मते. कथेद्वारेपरंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. खेड्यातली माणसं ,त्यांच्यातील परस्परसंबंध,आणि खेड्यांचे मन हे त्यांच्या कथांचे विषय आहे. त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलेले आहे. ग्रामीण जीवन,ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारच बदलल आहे हे जाणीव त्यांनी मांडली...... कधी ते जुन्या नव्यातील पडलेल्या अंतर समजून घेतील, तर कधी आजूबाजूच्या माणसाशी गप्पा मारत बसतील.आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा. अश्या वेगळ्याच गावाची पाटीलकी लाभलेला हा माणूस........ चार पाऊले उमटवू आपुली ठेवू खुणेचा मार्ग बरा..... असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करायला लावणारे शंकर पाटील.... शंकर पाटील हे नाव मराठी वाचकांच्या मनात एक स्थान मिळवून आहे.त्यांची चटपटीत संवाद आणि गावरान भाषेचा बाज हा प्रत्येक वेळेस नवीन प्रकारे आपल्या अनुभवास मिळतो. निसर्गातले विविध बदल,सामाजिक परवर्तन ह्याचा ग्रामीण संस्कृती होणार परिणाम ते आपल्या कथांमधून मांडतात.. शंकर पाटील म्हणतात की,आठवण या भरून आलेलया आभाळा सारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा धुवाधार पाऊस असो माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो.पावसाची एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मन भरून आलेले आभाळात दाहीदिशा लुप्त होतात.

पुस्तक परिचय

16 Oct, 07:30


AAYUSHYACHA ANTIM SANSKAR by PHILIP GOULD

फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’.  फिलिप गूल्डना कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं ‘व्हेन आय डाय’. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे डॉ. अजेय हर्डीकर यांनी ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मृत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

4,305

subscribers

1,691

photos

14

videos